तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडेत एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार

मत्स्यउदयोग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील मूलभूत सेवा सुविधांबरोबर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडे येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार. त्यासाठी संबंधित अधिकारी व उद्योगमंत्र्याशी बोलणार आहोत. असे  आश्वासन मत्स्यउदयोग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

नामदार नितेश राणे यांची राज्याच्या मत्स्य उदयोग व बंदर विकास मंत्री झाल्याबद्दल वैभववाडी येथे भाजपाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, नासिर काझी, भालचंद्र साठे,अरविंद रावराणे,जयेंद्र रावराणे, शारदा कांबळे, नेहा माईणकर, प्राची तावडे, नवलराज काळे, राजेंद्र राणे, वैभव रावराणे, संजय सावंत, संजय चव्हाण, बाप्पी मांजरेकर, विकास काटे, स्वप्नील खानविलकर, हुसेन लांजेकर, सुनील रावराणे, संजय रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री राणे पुढे म्हणाले, आपण राणे साहेबांप्रमाणे माझ्यावरही गेली दहा वर्षे प्रेम केलात.मी सत्तेत जाईन मंत्री होईन याची जाणीव नसताना तुम्ही मला निवडून दिलात. तुम्ही तुमचे काम केले आहे. आता या पुढे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही माझी आहे. मी जरी राज्यात कुठे ही असलो तरी माझे हृदय हे वैभववाडी आहे. मंत्री पदाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी असेल. माझ्यावर जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुलाप्रमाणे प्रेम केले आहे. मला वैभववाडीतील जनतेला न्याय दयायचा आहे. त्यामुळे वैभववाडीच्या विकासाच्या पुढे कोणी अधिकारी किंवा सत्तेचे कोणतेही पद मोठे नाही. बऱ्याचवेळी मी अधिकाऱ्यांना बोलतो त्यावेळी माध्यमे माझ्यावर टीका करतात. परंतु माझ्यासाठी तो अधिकारी नाही तर माझी जनता महत्वाची आहे. 

मी मंत्री म्हणजे तुम्ही सर्व मंत्री आहात. मी विधिमंडळात आहे. विधी मंडळात तुमची ताकद वाढवली आहे. तुम्ही विकासाच्या बाबतीत निश्चिंत राहा.मी मंत्री झालो तरी आपल्यातला संवाद हा पूर्वीसारखाच राहील. आपल्यात दरी पडायचा प्रयत्न केला जाईल. परंतु आपण थेट माझ्याशी संपर्क ठेवा. जे कोणी विरोधक असतील त्यांनी विकासाला विरोध म्हणून विरोध करू नये.आमच्या खांद्याला खांधा लावून काम करा. मात्र विरोधाला विरोध केल्यास सहन करणार नाही.असा इशाराही राणे यांनी दिला. यावेळी तालुक्यातील विविध संघटनाकडून मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के यांनी केले.

error: Content is protected !!