मसूरे (प्रतिनिधी) : ‘मराठबोली पुणे ‘ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. परमेश्वर उमरदंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व उद्योजक हेमंत परब, परीक्षक श्रीपाद टेंबे व साहेबराव पवळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दिवाळी अंकांची विशेष दखल घेणाऱ्या मराठबोली संस्थेतर्फे आयोजित या स्पर्धेत यंदा राज्यातून सुमारे ३५० दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचे परीक्षण शरद अत्रे व श्रीपाद टेंबे यांनी केले होते. स्पर्धेत दर्यावर्दी दिवाळी अंक – २०२४ या अंकास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘दर्यावर्दी’ दिवाळी अंकाचे संपादक अमोल सरतांडेल यांना शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर समारंभाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिन कुरकुटे यांनी केले.











