फोंडाघाटात खड्ड्यात पडून दोन लाकूड भरलेले ट्रक आडवे ! जीवित हानी नसली तरी, ट्रकचे व मालकांचे अतोनात नुकसान–

निखिल कन्स्ट्रक्शन आणि हॅम ला आणि किती अपघात बळींची अपेक्षा ? पर्यटक, वाहनचालकांचा संतप्त सवाल !

ठेकेदारांकडून हॅम अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटण्याचा अक्षता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटात, समुद्रातील बोटी तयार करण्याचे लाकूड भरलेला आणि नागपूर वरून गोव्याकडे जाणारा ट्रक ( एम एच ३६ एफ ६४४४ ) खड्ड्यामध्ये आडवा होता होता कलंडला. तर रविवारी पहाटे वैभववाडी वरून घाट माथ्यावर जाणारा लाकूड भरलेला ट्रक (४९७८) खड्ड्यात आपटल्याने रस्त्यावर आडवा झाला. लगतच्या भालेकर यांच्याकडून जेसीबी द्वारे दोन्ही ट्रक सरळ करून रस्ता मोकळा करण्यात आला. आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

खिंडीपासून पायथ्यापर्यंत चा रस्ता खड्ड्यामुळे जीर्ण झाला आहे. मोठमोठे खड्डे वळणावर पडले आहेत. हा रस्ता एम. एस. आय.डी. सी. च्या हॅम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर,सदरचे काम निखिल कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले आहे. याबाबत अनेकदा वृत्तपत्रातून-निवेदनाद्वारे आवाज उठवण्यात आला. लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात आले. करुळ घाटाबद्दल आस्था दाखवणाऱ्या मंत्री महोदयांनी कोल्हापूर मार्गे मुद्दाम प्रवास करून, रस्त्याची पाहणी केली. आणि खेद व्यक्त केला. हॅम प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी तातडीने खड्डे कायमस्वरूपी बुजवून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश दिले. मात्र महिना उलटून गेला तरीही, निखिल कन्स्ट्रक्शन ने अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ग्रामस्थ- वाहन चालक यांना ठेकेदार, मटेरियल टाकले आहे. दोन दिवसात कामाला सुरुवात होईल. असे बेजबाबदार उत्तर देऊन दिशाभुल करीत आहेत.याबद्दल ग्रामस्थ- वाहन चालक- पर्यटन यांचेतून प्रचंड क्षोभ व्यक्त होत आहे .

त्यामुळे निखिल कन्स्ट्रक्शन ला आणि किती अपघात अथवा बळी हवेत ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. फोंडा बाजारपेठेतील आठ दिवसापूर्वी भरलेले खड्डे उखडून डोकेबाहेर काढू लागले आहेत. त्यामुळे आठ दिवसात खिंडीपासून बाजारपेठ पर्यंतचे खड्डे कायमस्वरूपी न बुजवल्यास, सर्वपक्षीय रस्ता रोको सारखे आंदोलन विना नोटीस करण्याचे ठरविण्यात आले आहे. यास सर्वस्वी ठेकेदार आणि हॅम विभाग जबाबदार राहील.

error: Content is protected !!