विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मालवण पेंडूर येथे प्रतिपादन
मालवण पेंडूर मांड उत्सवात नार्वेकर यांनी दिली भेट
चौके ( प्रतिनिधी ) : कोकण हे सभ्यतेचे प्रतीक आहे. याच सिंधुदुर्गात राजकीय संस्कृतीत सभ्यता ठेवण्याचे कार्यही झाले आहे. याच कोकणचा माणूस आणि सिंधुदुर्गातील एक सुपुत्र मुंबईत जाऊन आमदार होतो ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नसून ही किमया व कमाल सिंधुदुर्गवासियांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर केलेल्या संस्कारांची आहे. या कोकणला न्याय मिळवून देणे आणि त्याद्वारे विकास अटल ठेवणे हे माझे कर्तव्यच नाही तर धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पेंडुर येथे बोलताना केले.
महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवित असलेले विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मालवण पेंडूर येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री देवी जुगाई मांड उत्सवाला भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी जुगाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्ट कमिटी, पाच बारा मानकरी, गावकर मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री नार्वेकर हे बोलत होते
यावेळी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल, सचिव ऍड अमित रेगे कुलकर्णी, खजिनदार सुनील परब, दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, दीपा सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा प सदस्य वैष्णवी लाड, अश्विनी पेडणेकर अंकिता सावंत ग्रामपंचायत अधिकारी कोठावळे रामू सावंत, भाऊ पटेल, संदेश नाईक, शेखर फोंडेकर, अमित सावंत, संतोष सावंत, विष्णू लाड, यश नाईक व अन्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, बॅ नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू अशा सर्व मंडळींनी सभ्यता व सौम्यता राजकारणात कशी टिकवावी याचे ज्वलंत उदाहरणं सातत्याने देशात ठेवले आहे. त्यामुळे माझा जन्म मुंबईतील असला तरी मूळ याच कोकणातील सभ्य मातीशी निगडित आहे, याचा मला अभिमान आहे. कोकणातील प्रत्येक घरातील एक तरी माणूस नोकरीसाठी, उद्योगासाठी गाव सोडून मुंबईत गेला, यापुढे कोकणतील माणूस कोकणातच राहून, सिंधुदुर्गातील माणूस सिंधुदुर्गात राहून त्याची प्रगती व उत्कर्ष होत राहील होईल ही ग्वाही मी देतो. मुंबईत गेलेला माणूस पुन्हा कोकणात येऊन संधी शोधेल यांची ग्वाही देतो. मुंबईत जेवढ्या संधी नाही तेवढा विकास व संधी कोकणात निर्माण करणारच असेही नार्वेकर म्हणाले. तसेच यावेळी नार्वेकर म्हणाले, अडीज वर्षांपूर्वी विधानसभा अध्यक्ष कोणाला करायचं, हा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर ठेवायचा हा प्रश्न होता. मात्र राज्याला कठीण परिस्थितीत पुढे नेण्याची जेव्हा वेळ आली, देशाला जेव्हा सक्षम नेतृत्व देण्याची वेळ आली तेव्हा कोकणी माणूसच पुढे दिसला आहे, राज्यासाठी, देशासाठी कुठचेही आव्हान पेलायची ताकद कोकणी माणसात, कोकणी मातीत आहे, असेही राहुल नार्वेकर म्हणाले. तर शेवटी अमित रेगे कुलकर्णी यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले












