भर हॉस्पिटल मध्ये सुरक्षा रक्षकावर केला कोयत्याने हल्ला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महेश बावकर यांच्यावर मद्यधुंद व्यक्तिकडून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे उपस्थित युवकांनी प्रसंगावधान राखत वेळीच हा प्रकार रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी बावकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एका इसमावर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महेश बावकर हे दुपारी रुग्णालय परिसरात सेवा बजावत असताना जेलनजीक राहणाऱ्या इसमाने त्यांच्याशी मद्यधुंद अवस्थेत येऊन हुज्जत घातली. त्यांनतर झालेल्या वादावादीचा राग मनात धरून त्याने घरी जात कोयता घेऊन तो पुन्हा रुग्णालयात आला. यावेळी त्या इसमाने पाठीमागे कोयता लपवून आणल्यामुळे तो निदर्शनास आला नाही. बावकर यांच्या जवळ येत त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करताच तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी तातडीने तो कोयता हिसकावून घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या झटापटीत बावकर हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, याबाबत सुरक्षा रक्षक बावकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर दारूच्या नशेत दुखापत करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस अधीक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!