अवैध दारू वाहतूक करणाऱ्या हमसफर ट्रॅव्हल्स लक्झरीचे पोलिसांसमोरच पलायन

चालक क्लिनर वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट चेकपोस्टवर हमसफर ट्रॅव्हल्स च्या लक्झरीच्या डिकीतून अवैध दारू वाहतूक होताना कणकवली पोलिसांना आढळली. पण पुढील कारवाई करायच्या आधीच आधारकार्ड ड्रायव्हर केबिनमधून आणून पोलिसांना देण्याच्या बहाण्याने लक्झरी च्या चालक आणि क्लिनर ने लक्झरीसह पलायन केले. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता घडली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार सचिन अशोक माने यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ फेब्रुवारी रोजी फोंडाघाट चेकपोस्टवर त्यांच्यासह कॉन्स्टेबल सुशांत कोलते ड्युटीवर तैनात होते. फोंडाघाट चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असताना गोव्याहून औरंगाबाद च्या दिशेने जाणारी हमसफर ट्रॅव्हल्स ची लक्झरी गाडी क्रमांक (MP 09 DD 7766) ही आली असता पोलिसांनी चालक व क्लिनर कडे तपासणीसाठी डिकी ची चावी मागितली. तेव्हा त्यांनी चावी आमच्याकडे नसून मालकाकडे आहे असे सांगितले. तेव्हा संशय बळावल्याने जर चावी दिली नाही तर लक्झरी कणकवली पोलिस ठाण्यात नेण्यात येईल असे सांगताच त्यांनी डिकी ची चावी पोलिसांकडे दिली. डिकी उघडली असता आतमध्ये गोवा बनावटीची 10 हजार700 रुपयांची अवैध दारू सापडून आली. त्यानंतर लक्झरी चे चालक सय्यद मोहम्मद इब्राहिम व क्लिनर तुळशीराम सुभाष सूर्यवंशी यांच्याकडे त्यांची आधारकार्ड पोलिसांनी मागितली असता ड्रायव्हर केबिन मधून आधारकार्ड आणण्याच्या बहाण्याने लक्झरी चा चालक
सय्यद मोहम्मद इब्राहिम (वय ४४) व क्लिनर तुळशीराम सुभाष सूर्यवंशी (रा. शिर्डी, जी. औरंगाबाद) यांनी लक्झरी गाडीसह कोल्हापूर च्या दिशेने पलायन केले. याबाबत चालक सय्यद मोहम्मद इब्राहिम आणि
क्लिनर तुळशीराम सुभाष सूर्यवंशी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (a), 65 (e) , 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

error: Content is protected !!