वैभववाडी (प्रतिनिधी) : तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सर्वसामान्यांचे प्रवासाचे मुख्य साधन असलेली एस टी बस वाहतूक सुरु झाली आहे. लालपरी करूळ घाटातून धावू लागल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाटातून दुहेरी वाहतूक लवकरात लवकर सुरु करावी. अशी मागणी प्रवाशांनाकडून केली जात आहे.
करूळ घाटाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २२ जानेवारी २०२४ पासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तब्बल १४ महिन्यानंतर २४ फेब्रुवारी पासून करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.त्यानुसार घाटातून एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. मात्र आठ दिवस होऊनही एस टी वाहतूक सुरु झाली नव्हती. याबाबत दैनिक पुढारीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दाखल घेत एस टी विभागाने मंगळवार पासून एस टी बस सुरु करण्याचे आदेश सर्व आगार व्यवस्थापकांना दिले. त्यानुसार मंगळवारी वैभववाडी करूळ गगनबावडा अशी एस टी वाहतूक सरु झाली आहे.
तूर्त करूळ घाटातून वैभववाडी गगनबावडा अशी एकेरी वाहतूक सुरु आहे. तर गगनबावड्याहून येणाऱ्या एस टी बस या येताना भुईबावडा घाटातून पूर्वी प्रमाणे येत आहेत. त्यामुळे करूळ घाटातून येणाऱ्या जाणारी एस टी वाहतूक सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.












