वैभववाडीत स्थानिक सलून संघटना आणि एसी सलून मध्ये वाद

एसी सलूनमधील परप्रांतीय कामगारांना मारहाण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथील ॲपल ए.सी. सलून व स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलून मधील परप्रांतीय कामगाराला माराहाण केली. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वैभववाडी बाजारातपेठत इनामदार प्लाझा येथे ॲपल नामक ए. सी सलून महिनाभरपूर्वी श्रद्धा चव्हाण रा. देवगड यांनी सुरु केले आहे. या सलून मध्ये त्यांनी परप्रांतीय कामगार ठेवले आहेत. याला स्थानिक नाभिक संघटनेच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. सलून मध्ये स्थानिक जिल्ह्यातील कामगार घ्यावेत अशी त्यांची भूमिका आहे. याबाबत सलून मालकांना त्यांनी त्याची कल्पना दिली असल्याचे नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीही परप्रांतीय कामगार घेऊन सलून सुरु ठेवले आहे. काही दिवसापूर्वी काही काही नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सलूनला लॉक लावण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलून मध्ये जात परप्रांतीय कामगाराला माराहाण केली. याबाबत सलून मालक श्रद्धा चव्हाण या वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाणेत नोंद नव्हती. तर यावर विचारविनिमय करण्यासाठी स्थानिक नाभिक संघटनेचे व जिल्ह्याचे पदाधिकारी वैभववाडीत जमा झाले होते.

error: Content is protected !!