कोल्हापूर (प्रतिनिधी) : गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमध्ये पंचगंगा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पुर परिस्थितीच्या अनुषंगाने या महामार्गावरील स्थानिकांच्या समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे तसेच पावसाळ्यात या परिसरातील लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या आढाव्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक तर दूरदृष्टी प्रणाली द्वारे संतोष शेलार आदी उपस्थित होते. या पूल उभारणीच्या अनुषंगाने तांत्रिक तज्ज्ञांनी येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी अशी सूचना करून आबिटकर म्हणाले, पावसाळ्यात या प्रस्तावित पुलाच्या उभारणीच्या अनुषंगाने लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. त्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये. तर या पुलाच्या संदर्भात महाराष्ट्रातील नामांकित डिझायनर घेऊन या पुलाच्या उभारणी संदर्भात सर्वमान्य कालबद्ध तोडगा काढावा अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. या पुलाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढील शनिवारी बैठक घेवू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. या बैठकीसाठी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्यासह बालिंगा व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महामार्गावरील स्थानिक समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
