वायंगणी बौद्धवाडी भंडारवाडी येथील ओहोळात आढळली मगर

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सरपंच रुपेश पाटकर यांची वनविभागाकडे मगरीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी बौद्धवाडी भंडारवाडी येथील ओहोळात सोमवारी ग्रामस्थांना मगर नजरेस पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ओहोळात मगर आली कशी असा प्रश्न निर्माण झाला असू आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत वनविभागाने तातडीने मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी केली आहे.

वायंगणी बौद्धवाडी भंडारवाडी याभागातील ओहोळ हा वायंगणी देव मळ्याला लागूनच बारमाही वाहत असतो. सोमवारी या भागातून जाणाऱ्या ग्रामस्थांना ओहोळाच्या पाण्यात मगर सदृश्य हालचाल दिसली. याबाबत त्यांनी खात्री केली असता ती मगरच असल्याचे आढळून आल्याने या परीसरात मगर आली कशी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या भागात भातशेतीची कामे सुरू असल्याने शेततळ्याला लागून असलेल्या ओहोळात मगरीचे अस्तित्व दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी वनविभागाला खबर देत मगरीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!