सुरक्षित एसटी वाहतूक बंद असल्याने, शाळा – कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलाहा मुलींचे हाल ! अखेरच्या टप्प्यात शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिक्षणावर कोट्यावधीचा निधी खर्च होत असताना, आणि नवनवीन सीबीएससी सारख्या अत्याधुनिक अभ्यासाचा समावेश शिक्षणक्रमामध्ये होत असताना फोंडा — घाट ते राधानगरी दरम्यान चा रस्ता ४५ दिवसासाठी शासनाने बंद केल्याने आणि विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने, त्यांचे वर्ष वाया जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे …
हसणे पासून दाजीपूर पर्यंतच्या ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले फोंडा हायस्कूलहा कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येतात.१० मार्चपासून घाट रस्ता ते राधानगरी रस्ता एसटी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क व डांबरीकरण पूर्ण झाले असून , अपूर्ण शिलकोट व साईड पट्ट्यांचे काम अजूनही सुरू केलेले नाही. त्यामुळे शालेय वेळेत एसटी सुरू करण्यास कोणताही अडथळा नाही.फोंडा हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी याबाबत कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्याना,या वेळेत एसटी चालू करण्याचे निवेदन पत्र आठवडाभर अगोदर दिले आहे. कोल्हापूर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नी सुद्धा कोल्हापूर एसटी विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची सूचना केली आहे.
मात्र सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता एसटी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अद्याप निद्रिस्त आहे ? शनिवार तारीख पाच एप्रिल पासून परीक्षा सुरू होत आहेत. पालकमंत्री यांनी कणकवली आगाराकडे मिनी बसेस उपलब्ध केल्या आहेत. तरी शनिवारपासून कणकवली– हसणे अशी बस गांभीर्याने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी व अधीक्षक अभियंता एसटी विभाग यांना देऊन एस टी सुरू करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी आग्रही मागणी या मार्गावरील पालकांनी केली आहे. सुरक्षित एसटी वाहतूक सुरू न केल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलेस,शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी ही अपेक्षा पालकांनी केली आहे…












