चेअरमन गणपत वळंजू व सीईओ ईश्वरदास पावसकर यांची माहीती
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेने 2024-25 या आर्थिक वर्षात आपला प्रगतीचा चढता आलेख कायम राखत अपेक्षित उद्दीष्ट साध्य करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर संस्थेने आपली घोडदौड चालू ठेवली आहे. संस्थेस ढोबळ नफा 8.50 कोटी झाला असून आवश्यक तरतूदी केल्या नंतर सन 2024-25 सालाकरिता रू. 2 कोटी 30 लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन गणपत वळंजू व मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपले कार्यक्षेत्र विस्तारीत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष 2024-25 चा आपला लेखाजोखा सादर केला असून व्यवसायातील आपला चढता आलेख कायम ठेवला आहे. संस्थेने संस्थेचा सभासद ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वागिण विकासाकरिता सतत प्रयत्नशिल राहणे हे तत्व नजरेसमोर ठेवून आजतागायत आपली वाटचाल केली असून याच जोरावर संस्था अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कसोशीने आपल्या कामकाजात वापर करत ग्राहकांस तत्पर तसेच चांगली सेवा कशी मिळेल याकरिता संस्था सातत्याने प्रयत्नशिल राहिली आहे.
संस्था आज सीबीएस मध्ये काम करत असून संस्थेने मोबाईल अॅप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्युआर, एसएमस अर्लट, डोअर बँकिंग, नेट बँकिंग, इनोंच, इनकमिंग-आउटगोईंग क्युआर तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिग्मी संकलन हे पिग्मी मशिन बरोबरच मोबाईल अॅप व्दारे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही आजची काळाची गरज आहे. त्यास प्राधान्य देउन संस्थेने तत्पर व पारदर्शक सेवा देण्यास आपण कटीबंध असल्याचे दाखवून दिले आहे. संस्थेच्या आर्थिक स्थिती तसेच सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत संस्थेस अनेक संस्थांनी विशेष पुरस्कार देउन गौरविले आहे. विशेष उल्लेख करावयाचा तर अविज्ञ पब्लिकेशन, कोल्हापूर यांनी संस्थेस सन 2024 चा ’बॅको ब्लू रिबन’ हा मानाचा मानला जाणारा पुरस्कार देउन गौरविले आहे.
या आर्थिक वर्षा अखेर संस्थेचे भाग भांडवल रू. 3कोटी 63 लाख झाले असून त्यामध्ये 15.93 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ठेवी रू. 150 कोटी 65 लाख झाले असून त्यामध्ये 22.89 टक्के वाढ, कर्ज रू. 127 कोटी झाले असून त्यामध्ये 28 टक्के वाढ, निधी रू. 11 कोटी 61 लाख झाले असून त्यामध्ये 23 टक्के वाढ, गुंतवणूक रू. 40 कोटी 32 लाख झाले असून त्यामध्ये 8.76 टक्के वाढ झाली आहे. संस्थेस ढोबळ नफा 8.50 कोटी झाला असून आवश्यक तरतूदी केल्या नंतर सन 2024-25 सालाकरिता रू. 2 कोटी 30 लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे. संस्थेचा समिश्र व्यवसाय 278 कोटीचा असून संस्थेचे खेळते भांडवल रू. 174 कोटी 75 लाखाचे झाले असून उलाढाल रू. 1019.52 कोटी पर्यंत गेली आहे.
संस्था आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच सामाजिक भानही चांगल्या प्रकारे जपत आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमूख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहीजेत, आपला सभासद या पासून कुठेही मागे राहता नये याकरिता संस्था युध्द पातळीवर काम करत असून येणा-या काळात संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हयात आचरा, कोल्हापूर जिल्हयात आजरा व रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हयात पाचल व राजापूर या ठिकाणी नवीन पाच शाखा सुरू होत असून संस्थेच्या सभासद व ग्राहकांना ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री. गणपत विठोबा वळंजू तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरदास शामसुंदर पावसकर यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या या प्रगतीमध्ये संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, कर्मचारी तसेच अल्पबचत प्रतिनिधींचे फार मोठे योगदान असल्याचे आर्वजून सांगितले. येणा-या काळात सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक तसेच असंख्य हितचिंतकांनी संस्थेच्या या विकासपर्वात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करून संस्था विकासात सर्वांनी हातभार लावण्याचे आव्हान मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरदास शा. पावसकर यांनी केले.












