गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई नाही, पालकमंत्र्यांकडून आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा केवळ फार्स – वैभव नाईक

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा न केल्यानेच सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली मात्र गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवल्याने मोठे नुकसान झाले होते. ओरोस ख्रिश्चनवाडी येथे शासनाने केलेल्या पंचयादीत ११ घरे पूर्णतः कोसळल्याचे नमूद असून त्यांचे एकूण ८९ लाख ४८ हजार रु. नुकसान झाले तर ८७ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याची एकूण २ कोटी ५१ लाख ५७ हजार रु. नुकसानीची नोंद आहे. ०७/०७/२०२४ रोजी या नुकसानीची पंचयादी घालण्यात आली असून एकट्या ओरोस येथील घरांच्या नुकसानीची एकूण ३ कोटी ४१ लाख रु नुकसान भरपाई वर्ष झाले तरी सरकारकडून नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. अशाच प्रकारे जिल्ह्यात इतर ठिकाणीही अनेक घरे कोसळली, घरांचे नुकसान झाले तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतीचेही नुकसान झाले होते.त्या सर्वांची कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई असून महायुती सरकारकडून एक रुपया देखील नुकसान ग्रस्त नागरिकांना अथवा शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. हि नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांनी कुठला पत्रव्यवहार केला हे त्यांनी जाहीर करावे. सत्ताधारी राणे कुटुंबाने आणि अधिकाऱ्यांनी कुठलाच पाठपुरावा केला नाही त्यामुळे सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीतही गतवर्षीच्या नुकसान भरपाईवर कोणतीही चर्चा पालकमंत्र्यांनी घडवून आणली नाही. अधिकाऱ्यांनीही त्याची आठवण करून दिली नाही. त्यामुळे हि बैठक केवळ फार्स असून त्यातून जनतेला काही मिळणार नसल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!