गटाराचे पाणी रस्त्यावर
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात गेल्यावर्षी ५५ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या गटारातून पावसाचे पाणी न जाता रस्त्यानेच जात आहे. ठिकठिकाणी दुकानासमोर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे गटारे पहिल्याच पावसात कुचकामी ठरली आहेत. पाणी साचल्यानंतर ड्रिल करून होल पाडण्यात येत असून रस्त्यावरील पाणी गटारात सोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
वैभववाडी शहरातील गटाराचा प्रश्न हा गेली दोन वर्षे चर्चेत आहे. गेल्यावर्षी दत्तमंदिर ते सावली हॉटेल दरम्यान गटाराचे काम करण्यात आले होते. या अर्धवट गटार लाईनमुळे गेल्यावर्षी सुद्धा पहिल्याच पावसात शहरात रस्त्यावर पाणी आले होते. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाण्यात बसून आंदोलन केले होते. त्यानंतर सावली हॉटेल पुढे गटार खणून पाणी पुढे सोडण्यात आले होते. या खुल्या गटारामुळे पावसातील चार महिने नागरिकांनी तारेवरची कसरत करावी लागली होती. पावसाळ्यानंतर उर्वरित काम करण्यात आले. त्यामुळे यावर्षी तरी गटाराचा प्रश्न सुटेल असे वाटत होते. मात्र पहिल्याच पावसात या गटार कामाचे पितळ उघडे पडले असून पावसाचे पाणी गटारातून न जाता रस्त्याने जाऊ लागले आहे. तर अनेक दुकान, हॉटेल समोर हे पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. त्यानंतर नगरपंचायतीच्यावतीने या गटाराला होल पाडून गटारात पाणी सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मुळात वैभववाडी बाजारपेठेचा विचार करता दत्तमंदिर ते शुक नदीपर्यत हे गटार बांधणे आवश्यक आहे. या गटारातून पावसाळ्यात पावसाचे पाणी जाणे अपेक्षित आहे. मात्र ही बंदिस्त गटर बांधताना सुमारे पाच फूट खोल व पाच फूट अशी भली मोठी बांधण्याची काय आवश्यकता होती. अशी चर्चा नागरिक करीत आहेत. त्यामुळे या गटारातील पाण्याचा निचारा न होता गटारात पाणी साचून राहणार आहे. पर्यायाने या साचलेल्या घाण पाण्यात डासांची पैदास होणार असून त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होणार आहे.
तर एस टी बस स्थानक पासून सुमारे १०० फूट नवीन गटाराचे काम नुकतेच करण्यात आले आहे. सध्या पडत असलेल्या जोरदार पावसाने हे गटार तलावासारखे भरले आहे. या गटारातील पाणी मोटार लावून उपासण्यात येत आहे.












