“महिलांची सहभागाची भूमिका ठरणार निर्णायक” – गटविकास अधिकारी शाम चव्हाण

चौके येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणावर दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

चौके (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना केवळ सुरू ठेवण्यात नव्हे, तर दीर्घकाळासाठी शाश्वत ठेवण्यात स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या प्रक्रियेत ग्रामपंचायत, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तसेच गावातील महिलांचा सहभाग निर्णायक ठरत आहे, असे मत गट विकास अधिकारी शाम चव्हाण यांनी व्यक्त केले.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत टप्पा-३ (स्तर-३) अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी पात्र ग्रामपंचायतींतील ५ प्रतिनिधींना उद्देशून दिनांक २० व २१ जून २०२५ रोजी भ.ता. चव्हाण,म.मा. विद्यालय,चौके येथील जयप्रकाश सभागृहात दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आणि जेपीएस फाउंडेशन, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचतगट प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सहभाग लक्षणीय होता.

तज्ज्ञ मार्गदर्शक  सहदेव पाटकर (मास्टर ट्रेनर)– यांनी समुदाय आधारित जल स्रोत व्यवस्थापन, समित्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या, तसेच भूजल संशोधनाच्या विविध पद्धतींबाबत माहिती दिली.

 फिजा मकाणदार यांनी जल जीवन मिशनचे उद्दिष्ट, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे स्रोत, संकल्पना आणि साठवणूक या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षनास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रतिनिधी  रुपाजी किनळेकर यांनी विशेष भेट देत सहभागींशी थेट संवाद साधला. त्यांनी पाण्याच्या भविष्यातील आव्हाने, जलसंवर्धन आणि संधारणाचे महत्त्व यावर सखोल विचार मांडत, स्थानिक पातळीवर जल स्रोतांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गट विकास अधिकारी श्याम चव्हाण आणि विस्तार अधिकारी (कृषी) सुनील चव्हाण यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या प्रशिक्षणातून उपस्थित प्रतिनिधींनी जलस्रोताच्या शाश्वतीबाबत नवे दृष्टिकोन आत्मसात केले आणि गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प घेतला

error: Content is protected !!