सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गच्या वतीने ३ ऑगस्टला साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : मराठी साहित्यातील निवडक कवितांचे अभिवाचन आणि अविस्मरणीय पाऊसगाण्यांची मैफल यांचा एकत्रित अनुभव देणारा खास कार्यक्रम ‘कविता वर्षावासाच्या… कविता परिवर्तनाच्या!’ कणकवलीत आयोजित करण्यात आला आहे. सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने होणारा हा बहारदार कार्यक्रम येत्या ३ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत एच. पी. सी. एल. सभागृह, कणकवली कॉलेज येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्य व नाट्य क्षेत्रातील मान्यवर कवी, लेखक, अभिनेते आणि गायक सहभागी होणार असून, सामाजिक परिवर्तनाची संकल्पना कवितांमधून प्रभावीपणे सादर केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा प्रसंवादचे संपादक इंजि. अनिल जाधव हे भूषवणार असून उद्घाटन ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार, कवी प्रा. प्रवीण बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रमुख कवी आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये वीरधवल परब, सुनील हेतकर, डॉ. अनिल धाकू कांबळी, डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. सोमनाथ कदम, विठ्ठल कदम, डॉ. नामदेव गवळी, प्रा. मोहन कुंभार, कल्पना मलये, प्रा. पूनम गायकवाड, सरिता पवार, पुरुषोत्तम कदम, सुचिता गायकवाड, नीलम यादव, स्नेहा कदम यांचा समावेश आहे. कवितांचे अभिवाचन आणि सादरीकरण अभय खडपकर, राजेंद्र कदम, सचिन वळंजू, निलेश पवार, सुदिन तांबे, प्रा. सीमा हडकर, विद्याधर तांबे, श्रेयश शिंदे, रुपाली कदम, शैलेश तांबे, सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे या नाट्यकलावंत व अभिनेते-संवादकांच्या आवाजात रंगणार आहे.
त्यासोबतच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल. संदेश रावले, महेश काणेकर, संदेश तांबे, राकेश मिठबावकर, अमृता घाडी आणि सहगायकमंडळी यांच्या सादरीकरणातून ही मैफल सादर होणार आहे. यासोबतच निमंत्रित कवींचे काव्यसंमेलनही रंगणार आहे. या सामाजिक परिवर्तनाच्या आशयघन आविष्काराची आणि साहित्य, नाट्य व संगीत यांची त्रिसंधी साधणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोषाध्यक्ष संध्या तांबे, सहकार्यवाह मधू मातोंडकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, कार्यवाह राजेश कदम, माजी अध्यक्ष अरुण नाईक व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.













