वैभववाडी (प्रतिनिधी) : मानव विकास गाड्यांच्या अनियमितपणामुळे अ. रा. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैभववाडी बस स्थानकात धरणे आंदोलन करीत एस. टी. बस रोखून धरल्या. अखेर आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले. मात्र यापुढे एस. टी. बस अनियमित धावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दिला आहे. मानव विकास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाच एस. टी. बस देण्यात आल्या आहेत. एस. टी. बस तालुक्यातील शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या महाविद्यालयाच्या वेळेनुसार सोडण्यात येतात. आता गेल्या काही दिवसापासून या बस वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या एस. टी. बस नियमित वेळेत सोडाव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी अ. रा. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी बस स्थानक येथे धरणे आंदोलन केले. यावेळी बस स्थानकात विदयार्थ्यांनी बस रोखून धरल्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली आगाराचे आगार प्रमुख अजय गायकवाड, स्थानक प्रमुख प्रदीप परब, भागोजी चव्हाण, वैभववाडी वाहतूक नियंत्रक बाबू गुरखे वैभववाडी बस स्थानकात आले होते. त्यांनी कार्याध्यक्ष रावराणे यांच्याशी चर्चा केली. मानव विकास गाड्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असताना त्या वेळेत सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या बस नियमित वेळेत विदयार्थ्यांच्या सोईनुसार वेळापत्रक तयार करा, अशी सूचना रावराणे यांनी केली. तसेच वैभववाडी तालुक्यासाठी दोन ज्यादा बस देण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावर डेपो मॅनेजर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसारच मानव विकासच्या एस. टी. बस सोडण्यात येतील, असे आश्वासन दिले त्यानंतर विद्यार्थ्यांचे हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र पुन्हा वेळापत्रक कोलमडले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रावराणे यांनी दिला आहे. यावेळी संचालक शरद नारकर व शिक्षक उपस्थित होते.












