फोंडाघाट मध्ये १७ सप्टेंबर रात्री ‘शिवमहिमा’ चा जागर ! हरsहरss महादेवsss ची गर्जना

बाल गोपाळ मंडळ, फोंडाघाट आयोजित श्रीदेवी माऊली दिंडी पथक, रेड्डीची विविध ट्रिक्स सीनयुक्त प्रेक्षणीय रंगीत संगीत दिंडी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या फोंडाघाट मध्ये गेला आठवडा श्री देव राधाकृष्ण मंदिर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह निमित्त, अहोरात्र विणे च्या झंकारात नामस्मरण सुरू आहे. विविध कार्यक्रम आणि फोंडाघाट माहेरवाशीणीसह, भाविक यांची रेलचेल सुरू आहे. मंदिर-बाजारपेठ मधील विद्युत रोषणाईमुळे दसऱ्यापूर्वीच बाजारपेठेत दिवाळी साजरी होत आहे. बालगोपाळांची लगबग अन् उपक्रमांसाठी नियोजनबद्ध धावपळ सुरू आहे.

बुधवार तारीख १७ सप्टेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी विविध सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह रेडी येथील श्रीदेवी माऊली दिंडी पथक यांची अविस्मरणीय तसेच प्रेक्षणीय “शिवमहिमा” या पौराणिक कथेवर आधारित रंगीत संगीत दिंडी रात्री दहा वाजले पासून बाजारपेठ ते मारुतीवाडी पर्यंत सादर होणार आहे. ढोल, ताशा, ध्वज, लेझीम, मृदंग, टाळ आणि गुलाल उधळणीत राधाss कृष्णाsss च्या जयजयकारात निघणाऱ्या या दिंडीचे नेतृत्व बाल गोपाळ मंडळ फोंडाघाट कडून केले जाते. बालगोपाळ अबालवृद्ध या दिंडीत बेधुंद होऊन जयजयकारात सहभागी होतात.

गेली कित्येक वर्षे मंगेश कामत यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षीच्या हरिनाम सप्ताहात नाविन्यपूर्ण भरगच्च ट्रिक्स सीनयुक्त असलेला जिवंत देखावा सादर करतात. यामध्ये कोकणची लोककला, संस्कृती, कुळाचार, मंदिर, रूढी, परंपरा, चालीरीती, किंबहुना दशावतार यांची जाणीव देखाव्यामध्ये प्रतिबिंबित होते आणि पथकातील सहकाऱ्यांची सहज सोपे परंतु प्रत्येकाचे मन जिंकणारी भूमिका दीर्घकाळ भाविकांच्या स्मरणात राहते. बदलत्या व्याख्या आणि मीडिया पुढे न झूकता, मानधनासाठी अडून न राहता, आपली कलाकारी-लोककला जिवंत ठेवण्याबरोबर, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने अन् रसिकांची वाsहssवा मिळावी, एवढी माफक अपेक्षा मंगेश कामत करतात.

शिवमहिमा या पौराणिक कथेवर आधारित देखाव्यामधील सहकारी यांच्या बरोबरीने लहान मुलाची भूमिका लक्षवेधी आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्यामुळे या रंगीत संगीत दिंडीचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन बालगोपाळ मंडळ फोंडाघाट कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!