कणकवलीतील संगीतकार जोडीने मुंबईत गाजवली बाजी!

५० व्या आय. एन. टी. एकांकिका स्पर्धेत चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांनी पटकावला ‘उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’चा पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच मुंबई येथे झालेल्या ५०व्या आय. एन. टी. (Indian National Theatre) च्या एकांकिका स्पर्धेत सिंधुदुर्गातील संगीतकार जोडी चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांनी ‘उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’ हा मानाचा किताब पटकावला. मुंबईमध्ये जाऊन इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शनाचा प्रथम क्रमांक पटकावणे ही मनाची गोष्ट आहे. हे दोन्हीही कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून जिल्ह्याचे नाव मोठं करण्याचं काम यांनी केलेलं आहे, यासाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सादर झालेल्या ‘मढं निघालं अनुदानाला’ (दिग्दर्शक – महेश कापरेकर व सागर चव्हाण) या एकांकिकेला परीक्षकांकडून उच्च दर्जाचे मानांकन मिळाले. सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून, दिग्दर्शक जोडीला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले. याचबरोबर या एकांकिकेला ‘मटा सन्मान’ देऊन गौरविण्यात आले आहे. एकांकिकेतील प्रभावी मांडणी, ठसठशीत अभिनय, तसेच संगीतकार जोडीने दिलेल्या लाइव्ह संगीतामुळे या नाटकाने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. नाटकाच्या आशयाला अधोरेखित करणारे संगीत, गायन आणि वाद्यमेळ या जोडीने अचूक साधला होता.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अक्षय केळकर, अभिनेत्री पूर्णिमा केंढे, रंगकर्मी राजेश वराडकर, दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी, तसेच रामचंद्र गावकर, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार कांटे, सुजय हांडे, तन्वी बर्वे हे मान्यवर कलाकार उपस्थित होते.

error: Content is protected !!