२३ ते २७ डिसेंबरदरम्यान कणकवलीत रंगणार ४८वी नाथ पै एकांकिका स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील नाट्यचळवळीचा समृद्ध वारसा पुढे नेणारी ४८वी नाथ पै एकांकिका स्पर्धा यंदा २३ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या स्पर्धेने मराठी नाट्यसृष्टीला अनेक दर्जेदार कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक दिले असून नाट्यसंवर्धनात तिचे मोलाचे योगदान राहिले आहे.

समाजप्रबोधन करणारे विचारवंत नेते नाथ पै यांच्या प्रगल्भ विचारांना अभिवादन म्हणून सुरू झालेल्या या स्पर्धेचा प्रवास गौरवशाली ठरला आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच नाट्यप्रयोगशीलतेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धेतून सातत्याने घडत आले आहे.

यंदा राज्याच्या विविध भागांतून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चिपळूण, सांगली, कोल्हापूर, मुंबई, कल्याण आणि सिंधुदुर्ग येथील एकूण २६ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये खुल्या गटातील ११ आणि शालेय गटातील १५ अशा एकूण २६ एकांकिकांचा समावेश असून विषय, आशय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने यावर्षीची स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

स्पर्धेची सुरुवात २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मान्यवर परीक्षकांच्या शुभहस्ते होणार असून, २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजल्यापासून एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्यरसिकांना दररोज दर्जेदार एकांकिकांचा आस्वाद घेता येणार आहे.

या पाच दिवसांच्या नाट्योत्सवासाठी ५०० रुपयांची एकत्रित प्रवेशिका तसेच ३०० रुपयांची प्रवेशिका उपलब्ध असून त्यांची विक्री सुरू आहे. नाट्यकलेचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह व कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

error: Content is protected !!