एकाच दिवशी तब्बल १८६ बंधाऱ्यांची उभारणी
कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्यात आज ‘बंधारा दिवस’ उत्साहात पाळण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १८६ वनराई / कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी वाढविणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे, या दृष्टीने बंधारे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कमी खर्चात व स्थानिक सहभागातून उभारले जाणारे हे बंधारे पर्यावरणपूरक व दीर्घकालीन फायदेशीर ठरत आहेत.

या बंधारा दिन उपक्रमाला ग्रामपंचायती, शेतकरी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, युवक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी संवर्धनाबाबत जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
तालुक्यातील नाले, ओढे व पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी उभारलेले हे १८६ बंधारे आगामी पावसाळ्यात पाणी साठवण व भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. अशा उपक्रमांमुळे शाश्वत शेती व ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










