१९७४/७५ च्या न्यू इंग्लिश स्कूलचा स्नेहासोहळा उगवाई च्या निसर्गरम्य परिसरात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मैत्रीच्या अन् त्यातही उगवाई देवीच्या प्रांगणात वयाचे बंधन नसते. झाले गेले विसरून, निसर्गाच्या छायेत आणि उगवाई मातेला साक्षी ठेवून, प्रत्येक जण ऊर्जा प्राप्त करत होता. आनंदी होता. निमित्त होते, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सन १९७४/७५ ची शेवटची ११ वी ची बॅच ! आणि तिच्या उदंड उत्साहात पार पडलेल्या स्नेह मिलनाचे ! वयाच्या ६५/७० वयाच्या मित्र-मैत्रिणी व्यावसायिक, उद्योग, नोकरी, आणि संसारातीच्या विवंचना विसरून पुढील वाटचाल करताना, आनंदहाविश्वासजी आणि आधाराने भारलेल्या मैत्रीच्या दुनियेत एकत्र जमले.
कैवल्याच्या चांदण्याला दिसे पहिलं तीर– अशा वयात सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, बचपन के दोस्त पूर्णानंद हॉलवर एकत्र जमले. दिवंगत मित्र-मैत्रिणींना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहताना, सर्वच भारावले. त्यांचे जाणे आणि आज नसणे सर्वांना पोकळी निर्माण करीत होते. कुमार नाडकर्णी यांनी स्नेहमिलनाची आवश्यकता आणि पुढील रूपरेषा स्पष्ट केली. सौ.उषा परुळेकर आणि सुरेश कुडतरकर यांनी या वयात, शरीरासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व विशद केले. आणि मग स्वागत, नवीन ओळ, आशा पेडणेकर मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, मज्जा- मस्ती- आनंदाला उधाण आले. तिरोडकर भाऊजी यांनी आपल्या कविता वाचन करून रंगत आणली. सौ.रमा नाडकर्णी यांचे “उंच माझा झोका” चे टायटल सॉंग टाळ्या घेऊन गेले. तर — सलामत रहे दोस्ताना हमारा| हे बाबा परुळेकर यांचे गीत सर्वांचे आकर्षण ठरले. दिगंबर अण्णा रावराणे यांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विविध रंगी कविता सादर करून धमाल उडवून दिली. गणपत मेस्त्री यांनी जीवन जगण्याची कथा प्रस्तुत केली.अखेर पहिल्या सत्राची सांगता करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पूर्णानंद हॉल फोंडाघाट येथे सकाळी इडली सांबाराचा यथेच्छ नाश्ता घेऊन, सर्वजण दोन ट्रॅव्हलर्सने नागमोडी रस्त्याच्या घाटातून फोंडाघाटच्या वेशीवरील आई उगवाई च्या मंदिरात उंच उंच पर्वत शिखरावर पोहोचले. वारा फणफणत होता. त्याचा आनंद अवर्णनीय होता. सर्वांनी उगवाई देवीचे दर्शन घेतले. माहेरवाशीणी- सुहासिनीनी आपल्या ओट्या भरल्या. त्यानंतर सर्वजण मंदिरासमोरील छोटेखानी सभा मंडपात जमले. या वयात सर्वांना निरामय आरोग्यासह, सुखशांती लाभावी, यासाठी बाबा आणि अण्णांनी मातेला गाऱ्हाणे केले .मग डॉ. महेश केळुसकर यांनी जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये आपली सुप्रसिद्ध ” झिनझिनाट ” ही कविता सादर करून, सर्वांनाच झिंग चढवली. ” मालग्या ” या विनोदी कवितेने सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडले. त्यानंतर सुरेश तळेकर यांनी महेशच्या जीवनपटावर घेतलेली चौफेर मुलाखत अंतर्मुख करून गेली.

आपल्या काळातील शिक्षकांच्या आठवणी, शाळेच्या गजाली, कवितांचे वाचन आणि विनोदाचे फवारे यात सुमारे दीड तास कधी गेला कळलेच नाही.पुन्हा एकदा उगवाई मातेची रखवाली घेऊन आमच्या गाड्या हसणे – तांबेवाडी येथे, राधानगरी लक्ष्मी तलावाच्या बॅक वॉटर ला कुशीत घेणाऱ्या, प्रेक्षणीय कमानी कडे पोहोचल्या.रस्त्याच्या कडेला विस्तीर्ण बॅक वॉटर आणि त्याला लगत तीन कमानींचे सुशोभीकरण, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून पर्यटनाच्या दृष्टीने केले आहे. पाण्यावरून येणारा शितल वारा,उडणारे केस – कपडे आणि निसर्गरम्य वातावरण– यामुळे फोटो आणि सेल्फीचा मोह कोणालाच आवरता आला नाही.

मात्र आता,पोटात कावळे ओरडू लागल्याने,गाड्या सुसाट हॉलच्या दिशेने घाट उतरू लागल्या. केटरर्स गौरव मुंज आणि त्याच्या टीमने बनविलेल्या सुग्रास भोजनावर, सर्वजण तुटून पडले. थोडी विश्रांती घेऊन, तिसऱ्या सत्राचा प्रारंभ झाला. पुन्हा एकदा सर्व मित्रगणांचे स्वागत बाबा परुळेकर, सुरेश कुडतरकर यांनी केले. यावेळी शाळेचे प्रतिनिधी मुख्या.प्रसाद पारकर, डॉ. महेश केळुसकर, बबन पवार, कुमार नाडकर्णी, नीतू पटेल, आबा सामंत, बाबा परुळेकर, चौगुले भाऊजी, तिरोडकर भाऊजी, गौरव मुंज आणि सहकारी यांचा त्यांच्या योगदानाबद्दल श्रीफळ,शाल, पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मैत्रीण सौ.नीतू पटेल हिचे सुपुत्र वैभव त्यांनी दिलेली संस्मरणभेट आणि ग्रुप कडून प्रत्येकाला देण्यात आलेल्या सन्मान चिन्हाचे यावेळी वाटप करण्यात आले. डॉ.महेश केळुसकर यांनी गजाली सांगताना आपल्या लोकप्रिय कविता सादर केल्या. वर्षभरात झालेल्या मित्रवर्याच्या वाढदिवसाचा प्रातिनिधीक केक कापून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.वहीनी- मैत्रिणींनी हळदी कुंकु-वाणा ची लूट केली. त्यानंतर स्नेहसोहळ्याबद्दल मनोगत, सूचना प्रत्येक उपस्थितांनी व्यक्त केल्या. त्या वेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि निरोपा नंतरची ताटातूट व पुन्हा भेटण्याची हुरूहुर स्पष्ट दिसत होती. अखेर आभार मानताना कुमारने पुन्हा एकदा “—झाले गेले विसरून जावे, पुन्हा पुन्हा भेटावे “. या टॅग लाईन वर निरोप दिला.हुरहुर लावणाऱ्या ह्या क्षणी सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.















