सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
कुडाळ (प्रतिनिधी) : घावनळे येथील अल्पवयीन युवती दिक्षा तिमाजी बागवे (१७) हिच्या खून प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (२४, रा. गोठोस) याचा नियमित जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय (सिंधुदुर्ग) यांनी फेटाळला. कुणाल याच्याविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र मुदतीत सादर केले आहे. कुणाल ३० ऑगस्ट २०२५ पासून प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. कुणाल याने वकिलामार्फत ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता.
न्यायालयात कुणाल याच्याविरूद्ध प्राप्त पुरावे व अन्य केसचे दाखले अभियोग पक्षातर्फे मांडून आरोपीच्या जामिनास विरोध करण्यात आला. न्यायालयाने आरोपीचे वकील व अभियोग पक्षाचे म्हणणे ऐकून कुणाल याने स्वतःहून दाखविलेला मृतदेह तसेच नमूद गुन्हा हा जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेणार असल्याचे अभियोग पक्षातर्फे मांडण्यात आले. हे मुद्दे विचारात घेऊन तसेच संशयित कुणाल याच्याविरुद्ध गुन्हा केल्याचा सबळ पुरावा असल्याची नोंद घेऊन त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.












