फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. कार्यक्रमात अर्थसंकल्पातील विविध तरतुदी, कररचना, ग्रामीण व कृषी विकास, उद्योग क्षेत्र, संरक्षण, वाहतूक तसेच सर्वसामान्य नागरिकांवरील परिणाम यांचा सखोल आढावा घेण्यात आला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, अर्थसंकल्प हा केवळ उत्पन्न-खर्चाचा हिशोब नसून देशाच्या आर्थिक धोरणाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. अशा प्रकारच्या चर्चासत्रांमुळे अर्थसंकल्पातील सकारात्मक व नकारात्मक पैलूंवर प्रकाश पडतो आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन विकसित होतो. हे चर्चासत्र ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी TJSB सहकारी बँक फोंडाघाट शाखेचे व्यवस्थापक विनायक जोशी यांनी बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. सुरुवातीला त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी ‘अर्थ’ या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले तसेच चाणक्य नीतीचा संदर्भ देत आर्थिक शिस्त आणि सुयोग्य नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्रीय अर्थसंकल्पातून शासनाला विविध मार्गांनी मिळणारे उत्पन्न आणि विविध क्षेत्रांवरील खर्च याची माहिती त्यांनी सविस्तर दिली. एमएसएमईसाठी असलेल्या तरतुदी, डिजिटल व्यवहारांना चालना, कर्ज धोरणे, अनुदान योजना आणि आर्थिक शिस्त यांवर त्यांनी विशेष भाष्य केले.
प्राचार्य डॉ. नारे अध्यक्षीय भाषणात, विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता तो देशाच्या आर्थिक दिशादर्शक दस्तऐवज म्हणून समजून घ्यावा, असे प्रतिपादन केले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये अग्रक्रमाकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. बाजीराव डाफळे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











