खारेपाटण पंचशील नगर येथे सापडला ७ फूट लांब अजगर

सर्पमित्र सुरेश पाटील यांच्या सहकार्याने वनविभागाकडे करण्यात आला सुपूर्द

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी पंचशील नगर येथील वस्तीत शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास साधारणतः ७ ते ८ फूट लांबीचा भला मोठा अजगर येथील नागरिकांना आढळून आला. ही बातमी समजताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर स्थानिक नागरिकांनी तत्काळ नांदगाव येथील सर्पमित्र सुरेश पाटील यांना दूरध्वनी वरून याबाबत माहिती दिली. व अजगराला पकडण्याबाबत विनंती केली. खारेपाटण पंचशील नगर येथे आढळून आलेला साप अर्थात भारतीय अजगर याला इंग्रजी मध्ये (इंडियन रॉक पायथॉन) असे म्हणतात.अंगावर पिवळसर तपकिरी रंगाचे अनियमित टिपके असतात व डोक्यावर भाल्यासारखी नकशी असते. हा सरपटणारा प्राणी निशाचर असून असून तो रात्री आपले भक्ष पकडण्यासाठी बाहेर पडतो.अंगाने जाड जुड असलेला हा बिनविषारी अजगर माणसावर सहसा हल्ला करीत नाही. मात्र त्याचे दात तीक्षण असल्याने जखम करू शकतो अशी माहिती सर्पमित्र सुरेश पाटील यांनी नागरिकांना दिली. खारेपाटण पंचशील नगर येथील युवक प्रथमेश कदम, संदीप पाटणकर, मकरंद पाटणकर, कुणाल पाटणकर यांच्या सहकार्याने सर्पमित्र सुरेश पाटील यांनी रेस्क्यू ऑपरेशन करीत या भल्या मोठ्या अजगराला सुरक्षित पकडले. साधारणतः १० किलो वजन असलेला हा अजगर सर्पमित्र सुरेश पाटील यांनी वनविभागाला सुपूर्द केला. तर खारेपाटण पंचशील नगर येथील नागरिकांनी सर्पमित्र सुरेश पाटील यांचे आभार मानले.

खारेपाटण पंचशील नगर येथे पकडण्यात आलेला अजगर यावेळी सर्पमित्र सुरेश पाटील व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!