अर्पिता मुंबरकर यांचा नशाबंदी क्षेत्रातील प्रबोधनाच्या विशेष कार्याबद्दल गोल्ड मेडल देऊन सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे ५ ते ७ जून दरम्यान संपन्न झाली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी क्षेत्रातील प्रबोधन कार्यात केलेल्या कामाचा सन्मान म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे झालेल्या संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठकीत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राज्य संघटक अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, ज्येष्ठ सदस्य बॉस्को डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे एकूण ३६ जिल्हा संघटक आहेत. यात अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी संदर्भातील प्रबोधनाच्या कार्यात विशेष मेहनत घेऊन आपले काम उत्तम पद्धतीने पार पाडले. या वर्षभरात दहा हजार नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचे विशेष काम केले, याबद्दल हा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्हा संघटक गौरव आळणे यांना सिल्वर मेडल तर पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांना ब्राँझ मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विभागीय संघटक म्हणून उत्तम काम केल्याबद्दल पुणे विभाग प्रमुख ऍड. सुरेश संकटे यांच्या टीमला सन्मानचिन्ह व रोख रक्कम तीन हजार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसरा क्रमांक कोकण विभागाच्या अर्पिता मुंबरकर यांच्या टीमला सन्मान चिन्ह व रोख रक्कम दोन हजार देऊन डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

५ ते ७ जून, २०२६ दरम्यान ही संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा संघटकांनी नशा मुक्तीच्या प्रबोधनाचे काम जोमाने करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ, मुंबई च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व राज्य संघटक अमोल मडामे यांनी सर्व जिल्हा संघटकांना मार्गदर्शन केले. या द्वयींच्या मार्गदर्शनाखाली सर्व ३६ जिल्हा संघटकांनी एकत्र बसून आपल्या कामाचे वार्षिक नियोजन केले. राज्यातील सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबवून नशा मुक्त भारत अभियानास अधिक बळ देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. राजन वेळुकर म्हणाले की नशाबंदी मंडळाचे काम गेली ६८ वर्षे अविरतपणे सुरू आहे. यात जिल्हा संघटकांचा वाटा खूपच मोलाचा आहे. नशाबंदी मंडळाचे, जिल्हा संघटक म्हणजे व्यसनमुक्तीच्या कार्यातले योद्धे आहेत, अशा शब्दात संघटकांचे कौतुक केले. अलिकडील व्यसनांचे प्रकार व आधुनिक पद्धतीने समुपदेशन या सगळ्यात संघटकांनी तत्पर राहण्याचे आवाहनही डॉ. राजन वेळूकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष वर्धाच्या डॉ. निकिता व त्यांची टीम उपस्थित होते.

बैठक समारोपप्रसंगी वर्धा जिल्हा समाज कल्याण विभाग निरीक्षक राज मरापे यांनी बैठकीस भेट देऊन संघटकांच्या कार्याचे कौतुक केले. या तीन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक राज्य संघटक अमोल मडामे यांनी केले. संघटक बैठकीचे उद्घाटन, कल्याण यात्रा मासिकाचे व संघटकांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व जिल्हा संघटकांनी या आर्थिक वर्षात व्यसनमुक्तीचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प करून बैठकीचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!