ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक यांची 100 टक्के पदे भरती करण्यासाठी

आझाद मैदान, मुंबई येथे शारीरिक शिक्षण संचालक महासंघाचे बेमुदत धरणे आंदोलन

मुंबई (प्रतिनीधी) : महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघ या संघटनेच्या वतीने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील 2017 नंतरच्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक यांची 100 टक्के पदे भरती केली जावी. व त्या संबंधित शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान- मंत्रालय, मुंबई येथील मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सोमवार दि. 08 जून 2026 रोजी पासून करण्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. आज आंदोलनचा सहावा दिवस आहे. शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही महाविद्यालय स्तरावरील प्राचार्य पदाच्या खालोखाल अत्यंत महत्त्वाची असणारी पदे असून या पदांना तासिका तत्वाचे धोरणही मागील काही वर्षात लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी 5012 सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. सदर शासन निर्णयामध्ये सदर दोन्ही पदांचा समावेश नसल्यामुळे पुन्हा शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांच्या पदरी निराशा पडली आहे. महाविद्यालय स्तरावर शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल ही अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या पदावर आजही विनावेतन असंख्य पात्रता धारक काम करीत आहेत.

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे दीर्घकाळ रिक्त :
2017 पासून अद्यापही वरिष्ठ महाविद्यालयातील ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे क्रीडा विभाग आणि ग्रंथालय कामकाजात अनेक अडथळे येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले असून युवा पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सातत्याने सांगण्यात येते. मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्याने शासनाचा उद्देश वास्तवात येण्यात अनेक अडचणी येत आहेत. याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ यांच्या पदभरतीच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी महासंघाने केली आहे. सदरच्या बेमुदत धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघ या संघटनेचे संस्थापक संदीप मनोरे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सिंहासने, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे,व जिल्हा उपअध्यक्षा प्रा.वैशाली सरगर-धडस, जिल्हा सचिव डॉ.अमित घाटुळे व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

१३/६/२०२६

आझाद मैदान- मंत्रालय, मुंबई येथील मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते

error: Content is protected !!