व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
वीज समस्येवरुन कुडाळात व्यापारी आणि ग्राहक आक्रमक
अधिकाऱ्यांना विचारला जाब
कुडाळ ( प्रतिनिधी ) : गेले काही दिवस कुडाळ शहरातील व्यापारी आणि नागरीक त्रस्त झाले होते. याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना आणि वीज नागरीकांनी महावितरणच्या कार्यालयाला धडक देत तक्रारींचा पाढा वाचला. शहरात वारंवार केले जाणारे लोड शेडींग, अपुरा कर्मचारी वर्ग , पावसाळी नियोजन अवास्तव पाठवली जाणारी वीज बिले या प्रश्नांबाबत व्यापाऱ्यांनी वीज वितरण अभियंता राजेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून अचानक केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पावसाळ्यापुर्वीचे नियोजन तात्काळ करावे अशी मागणी केली. यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट , सुनिल भोगटे , प्रसाद शिरसाट , राजू गवंडे , संदिप महाडेश्वर , राकेश वर्दम , द्वारकानाथ घुर्ये , नितीश महाडेश्वर , श्याम तेली , भूषण मठकर , अवधुत शिरसाट , आदी उपस्थित होते. यावेळी वीज वितरण अभियंता पाटील यांनी पावसाळी नियोजनाबाबत कुडाळ नगरपंचायतशी बैठक घेऊन नियोजन केले जाईल तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज वाहिन्यांना लागणारी झाडेझुडपे तोडण्यात आली असल्याची माहिती दिली. आणि लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून वीज सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.













