शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कुडाळ ( अमोल गोसावी ): शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, शिंदे-फडणवीस हे जनसामान्यांचे सरकार आहे. सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम होय. शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सिंधुदुर्ग दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडी येथे प्रथम दाखल झाल्यानंतर कुडाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थिती लावतील. यावेळी दिव्यांग बांधवांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्डीयाक ॲम्बुलन्स उद्घाटन, पोलीस प्रशासनाला नवीन वाहनांचे वाटप, नवीन अग्निशमन वाहने तसेच विविध स्टॉलची पाहणी आणि त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. प्राथमिक स्वरूपात २५ लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ वस्तू देण्यात येतील. यावेळी प्रमुख लोकप्रतिनिधींचे होतील मार्गदर्शन होईल,असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सामान्य लोकांपर्यंत सरकारच्या योजना जाणे आवश्यक यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, शासकीय योजना तळागाळातील तसेच सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जवळपास ७५ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी या योजनेद्वारे अनेक सुविधा पोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
आरोग्य, एसटी सेवा सज्ज या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिक घेत असल्याने त्यांच्या येण्या – जाण्यासाठी जवळपास ३०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातून एक एसटी सोडण्यात येईल. तसेच कडक उन्हाळा असल्याने उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सुद्धा सुसज्ज केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तसेच आरोग्य तपासणी कॅम्प येथे उभारण्यात आले आहेत. तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालय सुद्धा सज्ज असून उन्हापासून त्रास कमी होण्यासाठी टोप्या, पाणी बॉटल्सची व्यवस्था फॅन्स या सोयी करण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेवेळी भाजप नेते निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रभाकर सावंत, संजू परब, आनंद शिरवलकर, बंड्या सावंत, अशोक सावंत, किसन मांजरेकर, निलेश तेंडुलकर तसेच भाजप – शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!