चिंदर ग्रामपंचायत व चिंदर केंद्रातील जि.प. शाळा यांचा सहभाग
आचरा (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून आज 21 जून रोजी चिंदर गावठणवाडी येथील ऐतिहासिक शिवकालिन ब्राह्यणदेव तलावाकाठी योग दिन चिंदर ग्रामपंचायत व चिंदर केंद्रातील जि.प.शाळा यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर म्हणाले, योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा यामध्ये समावेश होतो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे आपल्याला म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. 21 जून रोजीच योग दिवस का साजरा केला जातो याला विशेष महत्व आहे. 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. यावेळी प्रभारी सरपंच दिपक सुर्वे, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, गावठणवाडी उन्नती मंडळाचे अध्यक्ष अरूण घाडी, शिक्षक-प्रविण तेली, नवनाथ भोळे, गंगाराम पोटघन, स्मिता जोशी, माधुरी पाटील, पंढरीनाथ करवडकर, विश्राम माळगांवकर, रणजित तसेच बहुसंख्य विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.












