गेल्या २ दिवसात पावसाने मुंबईत 6 जणांचा मृत्यू
ब्युरो न्युज (मुंबई) : गेल्या 24 तासात पावसाने मुंबईला येथेच्छ झोडपून काढले आहे. त्यानंतर आता पुढील 48 तास पावसाचेच असणार आहेत. मुंबईसह मध्यमहाराष्ट्रात दोन दिवसात धुवाँधार पाऊस होणार आहे.मुंबईसह राज्यात शनिवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. तसेच उशिरा का होईना पण पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे. मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली आहे. मुंबईत जोरदार पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. बोरिवली, दहिसर आणि जोगेश्वरी परिसरात तर घरांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे टीव्ही, फ्रिज वाहून जाताना दिसत आहेत. मुंबईत चार ठिकाणी घर कोसळले आहे. दोन दिवसाच्या पावसाने मुंबईत सहा जणांचा जीव घेतला आहे. ही सर्व दाणादाण उडालेली असतानाच मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान खात्याने तसा अलर्टही जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात समुद्र किनारावरील भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.













