विद्यार्थी ‘दैनंदिन नोंद’ वहीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
तळेरे (प्रतिनिधी): तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव मधून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयाच्या सभागृहात मान्यवराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अशी माहिती शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद राजाराम दळवी यांनी भूषविले तर या कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळीआणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या गणित विषयांच्या प्राध्यापिका कु.काजल मातोंडकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अनिल दळवी, सहसचिव गोविंद (राजा) दळवी, खजिनदार प्रकाश चव्हाण, सदस्य सूर्यकांत दळवी, शालेय समिती उपाध्यक्ष भानुदास तळगावकर, सदस्य महादेव दळवी,गावचे सरपंच लता खोत, माजी उपसरपंच प्रसाद दळवी, जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश चव्हाण, गावातील जेष्ठ सदस्य विद्याधर देसाई, माजी शालेय समिती सदस्य नामदेव दळवी, मुंबईस्थित तळगाववासी दिलीप दळवी, सौ. दळवी तसेच विद्यार्थी पालक नितीन वेंगुर्लेकर, श्री.व सौ. अनिल तळगावकर, रुचि कदम, शाळेचे माजी कर्मचारी नीलकंठ कदम हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुस्वर स्वागत गीताने कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ झाला. तदनंतर शिक्षक जैतापकर यांनी सर्व मान्यवरांचे शब्द सुमननांनी स्वागत केले शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक सादर केले आणि सोबतच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना संस्था आणि विद्यालय संबंधी माहिती आणि त्यांचे कार्य संक्षिप्त स्वरुपात सांगितले. शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि विद्यमान शैक्षणिक सल्लागार प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थितांना ओळख करून दिली आणि अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला सोबतच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित पालक, ग्रामस्थ, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आला. ओळख आणि स्वागत सत्कारानंतर कार्यक्रमाची मुख्य धुरा शालेय मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर मॅडम यांनी हाती घेतली आणि कार्यक्रमाचे मुख्य सत्कारमूर्ती म्हणजेच गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच कु.लता खोत यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .गुणवंत विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले आणि या सत्कारासाठी आणि शालेय जीवनातील संस्कार, शिक्षण आणि मार्गदर्शनासाठी विद्यालय आणि संस्था प्रति आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कु.काजल मातोंडकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील संभाव्य शैक्षणिक संधी संबंधी मार्गदर्शन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेछा देखील दिल्या तद्नंतर साहित्यिकां सौ.वृंदा कांबळी यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी विद्यार्थ्यांना खूपच मोलाचे सल्ले आपल्या रसाळ वाणीतून आणि सुंदर प्रेरणादायी कथांमधून विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष आनंद दळवी, सचिव अनिल दळवी आणि खजिनदार प्रकाश चव्हाण यांनी प्रायोजित केलेली विद्यार्थ्यांसाठीची ‘दैनंदिन नोंद’ वहीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले आणि त्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.जैतापकर यांनी केले. विद्यालयचे जेष्ठ शिक्षक पंडित माने यांनी मान्यवर, उपस्थित पालक, ग्रामस्थ,शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. मुख्याध्यापिका सौ.शिरोडकर, माजी मुख्याध्यापक आणि विद्यमान शैक्षणिक सल्लागार श्री.प्रदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.












