प्राथमिक शिक्षक समितीने छेडले जिल्हाधिकारी कार्यालया समाेर धरणे आंदाेलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध २७ मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यस्तरीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने तीन टप्प्यात आंदोलन निश्चित करण्यात आले असून या आंदोलनाला जन आंदोलनाचे रुप देण्याचा विचार यावेळी संघटना पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. संघटनेचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी विविध घोषणा देत या धरणे आंदोलनात वेगळी वातावरण निर्मिती केली. यावेळी डी एड बेरोजगारांना संभाव्य शिक्षक भरतीत सामावून घेण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांच्या सोडवणूकीसाठी संपूर्ण राज्यभरात तीन टप्प्यांत आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १५ जुलै रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे निदर्शने आंदोलन छेडण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या राज्यव्यापी आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक समितीचे सभासद मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, कोकण विभाग संपर्क प्रमुख प्रशांत मडगावकर, कोकण विभाग चिटणीस संतोष परब, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, चंद्रसेन पाताडे, जिल्हा प्रवक्ते सुनील चव्हाण, जिल्हा नेते नंदकुमार राणे, आपा सावंत, संतोष कुडाळकर, वैभवी कसालकर, लहू दहिफळे यांच्यासह जिल्हा, तालुका पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!