आमदार कोरे यांच्या निष्क्रियतेचा मतदारसंघाला फटका ; माजी आ. सत्यजित पाटील यांची घणाघाती टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा क्षेत्रातील विकासकामे विद्यमान आमदारांनी डिजिटल फलकांवर ठेवल्यामुळे मतदारसंघाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या भुलभुलैय्याला मतदारसंघातील जनता कंटाळली आहे, अशी घणाघाती टीका माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी आमदार विनय कोरे यांचा नामोल्लेख टाळून केली. आकुर्ळे, हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील जनसुराज्य शक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि आमदार कोरे समर्थकांनी शिवसेनाउद्धवठाकरे_पक्षात प्रवेश केला. आकुर्ळे येथे नुकताच हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मतदारसंघात आणलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याच्या पलिकडे विद्यमान आमदारांची तालुक्याच्या विकासात लक्षवेधी हालचालच जनतेला दिसलेली नाही ? असा टोलाही त्यांनी आ. कोरे यांना लगावला. माजी आ. पाटील म्हणाले, मागील आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघात हजार कोटींहून अधिकची विकासकामे खेचून आणली. विकासात कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. आजवर जुने आणि नवीन असा कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव केलेला नाही. समान न्यायाच्या भूमिकेमुळेच सत्तेशिवाय कार्यकर्त्यांचे पाठबळ अभेद्य राहिले आहे. यावेळी माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती हंबीरराव पाटील-भेडसगांवकर म्हणाले, सत्तेतील आमदारांना सोडून शिवसेना ठाकरे पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांमुळे गटाला उभारी मिळाली आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसिंह पाटील, माजी उपसभापती दिलीप पाटील यांची भाषणे झाली. आकुर्ळे येथील अशोक कुंभार, अशोक गायकवाड, सतीश मोरे तसेच हारुगडेवाडी येथील बाजीराव रावण, किरण नालूगडे, अमर नालूगडे, हेमंत खबाले, संग्राम खबाले या जनसुराज्य पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांना माजी आमदारांनी भगवा ध्वजाच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश दिला.

error: Content is protected !!