विद्युत महामंडळाचा गलथान कारभार समोर- गायीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथे परत एकदा विद्युत महामंडळाचा गलथान पणा पहायला मिळाला. आज सकाळी चिंदर सडेवाडी येथील जयेश मेघःशाम गोसावी हे गुरे चारण्यासाठी जवळील माळरानावर गेले असता. काही वेळातच त्यांची गाय विद्युत प्रवाहीत तारेच्या संपर्कात आली. जयेश गोसावी यांना काही कळायच्या आत गायीचा तडफडून मृत्यू झाला. गाय कशा मुळे तडफडते हे पाहाण्यासाठी गेल्यावर विद्युत तार तुटून पडलेली जयेश यांच्या लक्षात आली. या गायी बरोबर दोन कोल्ह्याचाही मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अन्यथा मनुष्यहाणी अटळ होती.
हे वृत्त प्रभारीसरपंच दिपक सुर्वे यांना समजताच तात्काळ धाव घेत, वायरमन, सहाय्यक अभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, वनक्षेत्रपाल, पोलिस पाटील यांना बोलावून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे. गायीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसत आहेत.











