मनसेकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; हेल्मेट घालून आरटीओ ऑफिसमध्ये प्रवेश करत केला निषेध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आरटीओ कार्यालयावर धडक देत वाहतुकीचे नियम आणि प्रत्यक्षात होत असलेली अंमलबजावणी या बाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला. तर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कायद्याचा वापर करा अशी मागणी केली.

मनसे पदाधिकाऱ्यांनी आज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात हॅल्मेट घालून प्रवेश करत निषेध व्यक्त केला.मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आरटीओ कार्यालयात धडक देत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विनोद सांडव,बाबल गावडे,आशिष सुभेदार,राजेश टंगसाळी,दिपक गावडे,आबा चिपकर,अमोल जंगले, आपा मांजरेकर,रामा सावंत,विनायक गावडे,वैभव धुरी, दुलाजी चौकेकर यांसह अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गोरगरीब जनतेकडून हॅल्मेटच्या नावाखाली वसुलीसाठी जेवढी कार्यतत्परता दाखवता तेवढी कर्नाटक पसिंगच्या गाड्यांकडून टिपीशिवाय चाललेल्या ओव्हरलोड वाहतूकीबाबत का दाखवत नाही असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दुचाकीची विक्री करताना शोरूम धारका नी दोन हेल्मेट देणे बंधनकारक असताना त्याप्रमाणे पुरवठा न होता दिखाऊपणासाठी बंधपत्र सादर केले जाते. यावर आरटीओंनी काय कारवाई केली, परिवहन विभागाच्या २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार अपंगांसाठीच्या शासकीय सुविधा व टॅक्स सूट बाबत जनजागृती का केली जात नाही, एजंटांशिवाय कार्यालयातील लायसन्स व पासिंगची कामे का होत नाहीत,थेट कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आरटीओ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक का केली जाते असा प्रश्न मनसेचे परशुराम उपरकर व प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत ज्याप्रमाणे हॅल्मेट सक्तीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावला गेला तसा आरटीओ कडील विविध सेवांसाठीचे दरपत्रक व सिटीझन चार्टर फलक लावण्याची मागणी केली. तसेच रस्ते आस्थापना सेलचे अमोल जंगले यांनी आरटीओ कार्यालय परिसरात प्रात्यक्षिक चाचणीसाठी वापरण्यात येत असलेला ट्रॅक आरटीओच्या नियमांना अनुसरून नाही. ट्रॅकवरील खुणा अस्पष्ट झाल्याने चाचणी (ट्रायल) देणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत याकडे लक्ष वेधले. तर परप्रांतीय व्यावसायिकांची ओव्हरलोड वाहतूक, जिल्ह्यातून होणारी गुरांची वाहतूक,हायवे प्राधिकरणाची वाहतूक सेफ्टीबाबत असलेली अनास्था,सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारित रस्त्यांवर स्पीड ब्रेकर दरम्यान अत्यावश्यक असलेले फलक यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत आर टी ओ ला धारेवर धरले. तसेच परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडून केवळ जनतेला नियम सांगण्यापेक्षा प्रशासकीय विभागांना नियम का शिकवत नाही. असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

लवकरच सूचनानुसार कार्यवाही करू

मनसेच्या पदधिकाऱ्या नी आज वाहतूकीचे नियम आणि होत असलेली अंमलबजावणी याबाबत लक्ष वेधल्यानतर आपल्या सूचनांप्रमाणे तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारीं नंदकिशोर काळे यांनी दिली.

कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरु

उपप्रदेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून केवळ दंड वसूल करण्यासाठी कारवाई केली जाते. मात्र वाहन चालकाच्या समस्या व अडचणी दूर करण्यासाठीच्या उपाय योजनेकडे दुर्लक्ष केला जात आहे. याबाबत लक्ष वेधले आहेत. येत्या महिन्यांत आवश्यक ते बदल न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.

error: Content is protected !!