शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नेरुरपारमार्गे मालवण या मुख्य रस्त्यावरील नेरुर जकात नाका ते नागदा मारुती मंदिरदरम्यान नेरुर कलमेवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री अतिवृष्टीमुळे ढासळला होता. यामुळे कुडाळ-मालवण रोडवरील अवजड वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत आज सदर पुलाच्या ढासळलेल्या भागाची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली.
याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी या घटनेचा ताबडतोब पाठपुरावा करून याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत पोहोचविली होती. त्यानंतर या पुलाची डागडुजी तत्काळ करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला दिली. त्यामुळे आज या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाची डागडुजी झाल्याने नागरिकांनी आमदार वैभव नाईक, बांधकाम विभागाच्या डेप्युटी इंजिनियर सीमा नार्वेकर, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अजयकुमार सर्वगोड यांचे आभार मानले आहेत.