श्रवण कौशल्याचा विकास करणे आवश्यक-जयंत मणेरकर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई आयोजित निळकंठ दीक्षित तथा बाळासाहेब दीक्षित स्मरणार्थ इंग्रजी निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कुशल अकॅडमी चे अध्यक्ष जयंत मणेरकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी व्यासपीठावर देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईचे उपाध्यक्ष सदानंद पवार, निबंध स्पर्धेचे प्रायोजक आणि देवगड एज्युकेशन बोर्ड ,मुंबई चे सहकार्यवाह निरंजन दीक्षित, स्थानीय समिती पदाधिकारी चंद्रकांत शिंगाडे, अनुश्री पारकर, स्थानीय समिती वाडा चे अध्यक्ष शांताराम पुजारे, वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण माने, देवगड हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षक सुनील घस्ती या निबंध स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक रमाकांत बांदेकर, मुंबई येथील भूषण पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. एकूण चार गटांमध्ये झालेल्या या निबंध स्पर्धेमधील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जयंत मणेरकर , भूषण पोकळे, निबंध स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक रमाकांत बांदेकर आणि या स्पर्धेचे प्रायोजक निरंजन दीक्षित यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी जयंत मणेरकर यांनी जीवनातील इंग्रजी विषयाचे महत्त्व तसेच इंग्रजी भाषा अवगत करण्याचे महत्त्व विशद केले. सरावाने आपल्याला इंग्रजी भाषा सहजरित्या आत्मसात करता येईल यासाठी अधिकाधिक इंग्रजी भाषा श्रवण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये सदानंद पवार यांनी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच आपल्या अंगभूत चांगल्या कौशल्याचा विकास करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांमधून डॉक्टर मुकुल प्रभू देसाई यांनी देखील आपले मनोगत मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुनील घस्ती यांनी तर निवेदन व आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर यांनी केले.

error: Content is protected !!