अन्यथा सेना स्टाईल आंदोलन ; नांदगाववासीयांचा पोलीस ठाण्यात घेराव
कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील नांदगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू आहे. येत्या आठ दिवसांत या दारू व्यवसायावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने या दारू विक्रेत्यांना धडा शिकवू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. येथील पोलीस ठाण्यात आज नांदगावमधील काही ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदींनी चर्चा केली. नांदगाव परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्या विरोधात पोलीस प्रशासन काय करत आहे असा सवाल संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह नांदगाव वासीयांनी केला. तर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आत्तापर्यंत जेथे अवैध दारू धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली, त्या सर्व ठिकाणी कारवाई केल्याची माहिती दिली. तर इतर ठिकाणी जशी पोलिसाकडून कारवाई केली जाते तशी नांदगाव परिसरात होत नसल्याचा आरोप नांदगाव वासीयांनी केला. यावर पोलीस निरीक्षक श्री. यादव यांनी अवैध दारू विक्री होत असल्याच्या परिसराचे लोकशन शेअर करा तातडीने कारवाई करतो असा इशारा दिला. नांदगाव मधील अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे कारवाई झाली तरी अवैध दारू व्यवसाय सुरू राहतो. त्यामुळे पुन्हा दारू विक्री करण्याची कुणाची हिम्मत होता नये अशी कारवाई करा अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. अवैध दारू विक्री प्रश्नी कणकवली पोलीस निरीक्षकांसोबत जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, दिव्या साळगावकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, राजू राठोड, तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, भाई साटम, निसार शेख, राजा म्हसकर, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, तात्या निकम, संजय पारकर, सचिन सावंत आदीन चर्चा केली.











