वंचितासाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थानी व दिव्यांगांनी निर्मिलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे मालाडमधे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : आनंदवन मित्र मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने वंचितांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दिव्यांगानी निर्मिलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन मालाड मधील ठाणेकर हाऊस येथे नुकतेच करण्यात आले होते.असा अभिनव व स्तुत्य उप्रकम राबविण्यात आल्याबद्दल या सामाजिक संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन केले जात आहे. तर प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे या सा संस्थेचे ४ थे वर्ष असून नागरिकांचा याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन मधील सेवा कार्याची प्रेरणा घेवून समाजातील निराधार, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य अनेक कार्यकर्त्यांनी आयुष्यभर नेटाने केले. आजही ते करीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मालाड मुंबई येथील आनंद वन मित्र मंडळ ही संस्था. मालाड येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक व निस्पृह सामाजिक कार्यकर्ते कमलाकर (मामा) ठाणेकर यांची आनंदवन मित्र मंडळ संस्थेच्या कार्यकर्त्यांना घडविण्यात महत्वाची भुमिका राहिली.
आनंद वन मित्र मंडळ ही संस्था बाबा आमटेंच्या आनंदवन बरोबरच समाजातील उपेक्षिंतासाठी कार्य करणा-या अनेक स्वयंसेवी संस्थासाठी सतत निधी आणि संसाधने संकलित करण्याचे कार्य करीत असते. वंचितांसाठी निधी संकलन कार्याचाच एक भाग म्हणून आनंदवन मित्र मंडळ समाजातील दिव्यांग, निराधार व वंचितासाठी कार्य करणा-या संस्थानी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री दरवर्षी दिवाळीच्या आधी भरवीत असते.
अशाप्रकारच्या प्रदर्शनाचे संस्थेचे हे चौथे वर्ष असून मुंबईतील मालाड पश्चिमेला असलेल्या सोमवार बाजारातील ठाणेकर हाऊसच्या प्रकाश आनंद भुवनमधे यंदाच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात आशियाना-अंधेरी, पुनर्वास, जीवन आनंद संस्था, आनंदवन, सदाफुली, स्नेहज्योत, सुमो क्रीएशन या संस्थासह यश सुर्यवंशी , संदिप व स्वाती भावे, सागर पाटिल, कृतूजा बुटाला या व्यक्तींनी निर्मिलेल्या वस्तूंच्या स्टाँलचा प्रदर्शनात सहभाग होता.
आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री व स्मिता गावस्कर, सारिका केळंबेकर यांचे मार्गदर्शनाने संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.