नैसर्गिक शेती या उपक्रमाला शासनाने मान्यता दिली- ब्रिगेडियर सुधीर सावंत
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रा द्वारे राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या व युवकांच्या सामजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सुरू केलेल्या नैसर्गिक शेती या उपक्रमाला शासनाने मान्यता दिली असल्याने गेली सात वर्षे आम्ही घेत असलेली मेहनत फळाला आली असल्याची माहिती संस्थाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात ब्रिगेडियर सावंत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शास्त्रज्ञ विलास सावंत व अन्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी, आम्ही राबवित असलेल्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामुळे प्रोत्साहन मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय द्वारे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रमाने आरोग्य, उद्योग, संस्कृती, पाणी, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, वीज हे घटक अंतर्भूत आहेत. कोकणामध्ये नैसर्गिक शेतीची चळवळ उभी राहण्यासाठी गेली ७ वर्षे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी मी पाठपुरावा करून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरु केले आहे. या मिशन द्वारे नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करून देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रा द्वारे नैसर्गिक शेतीचा प्रचार, प्रसार व संशोधन करण्यासाठी योजना तयार केली आहे. प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राला नैसर्गिक शेतीच्या उपक्रमांसाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. आतापर्यंत ५००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणण्यात आले आहे. येत्या उन्हाळी हंगामात ५०० हेक्टर क्षेत्रावर नैसगिक शेती कार्यक्रम राबविण्याचे उदिष्ट आहे, असल्याचे यावेळी ब्रिगेडियर सावंत म्हणाले.