जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या जलतरण खेळाडू पूर्वा गावडे हिला शुभेच्छा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिने राष्ट्रीय स्तरा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिची होणारी निवड हा सिंधुदूर्ग वासियांसाठी सुदिन दिवस असेल अशा शब्दात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय जलतरण खेळाडू पूर्वा गावडे हिला शुभेच्छा दिल्या. मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने पूर्वा गावडे हीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार लक्षात विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याहस्ते पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकर संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्ष विनोद परब, खजिनदार गिरीश परब, सह सचिव सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर, संजय वालावलकर, विनोद दळवी , दत्तप्रसाद वालावलकर, माहिती कार्यालयाचे अमित राणे, पूर्वाची आई रश्मी गावडे आदी उपस्थित होते. पूर्वा हीची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ती सहभागी झाली होती. विशेष म्हणजे वय कमी असूनही तिला सीनिअर गटातून संधी देण्यात आली होती. मात्र येथेही तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत चौथा क्रमांक पटकावला. पुणे येथील बालेवाडी अकादमीत जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या या सिंधू कन्येने आता पर्यंतच्या प्रवासात राज्य व राष्ट्रीय स्तरावर ७६ पदके मिळवली आहेत. मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पूर्वा हीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी तावडे यांनी पूर्वा हीची कामगिरी गौरविताना तिच्या यशस्वीतेसाठी तिच्या आई वडिलांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही असे कौतुक केले. तोरसकर यांनी ही जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पूर्वाचे भेटवस्तू देवून अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष बाळ खडपकार यांनी मनोगत व्यक्त केले. लवू म्हाडेश्र्वर यांनी सूत्र संचालन केले. तर विनोद दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.