मालवण (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव , संत रविदास महाराज, संत कबीर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, अशा अनेक संतांनी आपल्या अभंग रचनेतून आणि आचरणातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. तर नास्तिक शिरोमणी चार्वाक, भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज,. छ. संभाजी महाराज,छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद आधी विचारवंतानी या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मूळस्रोत याच संत, महात्मे, विचारवंतांच्या चळवळीतून सुरू झाले आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी आयोजित विज्ञानाची कास धरा या प्रबोधन पर व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या समवेत अशोक कांबळी_ अध्यक्ष, जे.एम फर्नांडिस व सुरेश गावकर उपाध्यक्ष, प्रकाश पुजारे खजिनदार, बाबाजी भिसे – सल्लागार, लक्ष्मण आचरेकर- संस्थापक सदस्य, फर्नांडिस-सहसचिव, मनाली पाठक- महिला प्रमुख ‘ श्रृती गोगटे आदी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की भारतामध्ये जादूटोणा विरोधी कायदा एक मताने संमत करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे . हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आणि संविधानाने नागरिकांना दिलेल्या देवधर्म या स्वातंत्र्याच्या विरुद्ध जाणार नाही याची काळजी घेण्यात आली . मात्र देव धर्माच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या बुवा, बाबा, बाया, मांत्रीक, भगत, ज्योतिषी, यांच्या विरुद्ध हा कायदा आहे. संत आणि विचारवंतांचे विचार जो आत्मसात करेल त्याच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल . त्याला जगण्याची एक नवी दिशा मिळेल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल . असे प्रतिपादन त्यांनी केली .यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्यातील बारा अनुसूचीची उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिली . बुवाबाजीचा फर्दा पाश करणारे हातचलाकीचे , तसेच विविध रासायनिक संयोगाने होणारे चमत्कार, त्याचे प्रात्यक्षिक, त्यामागील विज्ञान, त्याची कारणमीमांसा लोकांना पटवून दिली. यामध्ये पाण्याने दिवा पेटवणे, जीभेतून तार काढून दाखवणे, अधांतरी नारळ उभा करणे, विभूतीचा रंग लाल करणे, अगरबत्तीच्या सहाय्याने करणी काढणे, नारळातून खिळे, चिंध्या काढणे ,लिंबातून रक्त काढून दाखवणे, आधी प्रात्यक्षिक करून दाखवली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष आनंद धामापुरकर, सदस्य संदीप धामापूरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सानेगुरुजी कथामाला मालवण व कोकण मराठी साहित्य परिषद मालवणे चे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर गुरुजी यांनी केले होते.