आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय
मुंबई (ब्युरो न्युज): राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये इतके मानधनवाढ देण्यात येणार आहे. तर राज्यातील 3,664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6,200 रुपयांची मानधन वाढ देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात 7000 रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे. राज्यात 3,664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज 6,200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8,775 रुपये मानधन मिळत असून, आता त्यांना 21,175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्य मंत्री प्रा डॉ. सावंत यांनी केली आहे.आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.