कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर आजवर एकही पक्षाने परप्रांतीयांची संघटनेची मोट बांधली नाही. मात्र आता मतपेटीवर डोळा ठेवून भाजपा उत्तर भारतीयांची संघटना बांधून नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांचा विचार केल्यास अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश बिहार मधील गुन्हेगार जास्त प्रमाणात आढळत आहेत. एकीकडे या परप्रांतीयांनी सिंधुदुर्गातील युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. अकुशल लेबर वर्क पासून स्किल वर्क लेबर पर्यंत ची सर्व कामे हे परप्रांतीय बळकावत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील स्थानिक युवक मात्र बेरोजगार होत आहेत. एकीकडे आमदार नितेश राणे परप्रांतीयांविरोधात बोलत असताना दुसरीकडे भाजपा चे पदाधिकारी मात्र उत्तर भारतीयांचे लाड करत आहेत.या परप्रांतीयांची नोंदणी सुद्धा रीतसर पोलीस यंत्रणेकडे होत नाही. त्याकडेही पोलीस अधीक्षकांचे लक्ष मनसे वेधणार आहे. प्रसंगी यासाठी रस्त्यावरही उतरणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सरपंच आणि सदस्य भाजपचे निवडून आले याची दिवाळी भेट म्हणून परप्रांतीयांची संघटना भाजपा देत आहे काय ? जिल्ह्यात गरीब अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यामध्ये याच परप्रांतीयांची नावे समोर मोठ्या प्रमाणात येतात. परप्रांतियांकडे ह्यावेळी दुर्लक्ष केल्यास भविष्यात उत्तर भारतीय सरपंच सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. उत्तर भारतीयांचे लोण भाजपा पसरवत आहे. हे वेळेत जिल्हावासीयांनी रोखायला हवे असे उपरकर म्हणाले.
सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण पसरवण्यामागे भाजपा – परशुराम उपरकर












