देवगड (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पृथ्वी तत्वाचा विचार करून अनेक उपक्रम किंजवडे ग्रामपंचायतच्या वतीने राबवले जात आहेत. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त आणि क्रियाशील सहभाग राहिला आहे. आपली पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर ठेवायची असेल तर सुरुवात माझ्यापासून, माझ्या घरापासून, माझ्या परिसरापासून केली पाहिजे असा विचार किंजवडे परबवाडी येथील महिलांच्या मनात निर्माण झाला. नेहमी सणासुदीला, कार्यक्रमाला हौसेने एकत्र येणाऱ्या महिला आपल्या गावाची साफसफाई करण्यासाठी एकत्र आल्या आणि परबवाडीच रुपच बदलून टाकलं. केरसुनी, टोपल्या, कचरापेटी या लवाजम्यासहित येऊन सर्व कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावली. सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक कचरा अशा पद्धतीने कचरा एकत्र करण्यात आला. किंजवडे परबवाडीतील महिलांच्या या ऐक्याबद्दल आणि स्वच्छता कार्यातील पुढाकाराबद्दल ग्रामपंचायत किंजवडे यांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. गावातील इतर ग्रामस्थ देखील याप्रमाणे एकत्र येऊन गावाचा कायापालट करतील असा विश्वास ग्रामपंचायतच्यावतीने व्यक्त करण्यात आला.













