ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण
चौके (अमोल गोसावी) : सोमवार २२ जानेवारी या शुभदिनी अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामाच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा हा भव्य सोहळा पार पडत आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील चौके गावातील ग्रामस्थ सकाळी दहा वाजता चौके ग्रामपंचायत ते भराडी मंदिर असे भव्य प्रभू श्री रामाचा प्रतिकात्मक फोटो तसेच गाडीतून प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशी वेशभूषा असणारी शोभयात्रा निघणार आहे. यावेळी टाळ मृदूंगांच्या गजरात राम नमाचा जयघोष करून चौके परिसर भक्तीमय होणार आहे. दुपारी ही शोभायात्रा मंदिरात पोचल्यावर प्रभू श्री रामाचा भव्य फोटो मंदिरात ठेवण्यात येणार आहे. यानंतर मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. दुपारी उपस्थित सर्वाना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी मंदिरात दिवे लावून चौकेवासीय या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.











