“निर्भय बना हा वर्तमानाचा आवाज आहे व तो असायला हवा ” – डॉ.महेश केळुसकर

केळुसकरकविवर्य आ. सो. शेवरे स्मृती चषक स्वरचित खुल्या काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ ठाण्यात थाटात संपन्न

प्रथम क्रमांक : अनिल कांबळे – द्वितीय क्रमांक : अशोक कांबळे – तृतीय क्रमांक: अनुराधा विभुते यांना पारितोषिक प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : ” निर्भय बना हा वर्तमानाचा आवाज आहे व तो असायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डाॅ. महेश केळुसकर यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथील सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग मुंबई शाखा आयोजित, कविवर्य आ. सो. शेवरे स्मृती चषक स्वरचित खुल्या काव्यलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले.

कविवर्य आ. सो. शेवरे स्मृती चषक स्वरचित खुल्या काव्यलेखन स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून तब्ब्ल ३४८ कवींच्या सहभागाने पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेत्या कवींना ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका आशालता कांबळे उपस्थित होत्या. “चळवळीसाठी काम करणे हाच आमचा एकमेव धर्म, याशिवाय आमचा कोणताही धर्म नाही” असे वक्तव्य करून कवींच्या कवितेला आता कणखर भूमिका असायला हवी, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले. नुकतेच झालेले ज्येष्ठ पत्रकारांवरील हल्ले, सातत्याने होणारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, संविधान विरोधी वृत्ती या साऱ्या मनसुब्यांवर आ. सो. शेवरे काव्यलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सभारंभात, चर्चा होऊन अशा घटनांचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.

कविवर्य आ. सो. शेवरे स्मृती चषक राज्यस्तरीय स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत ३४८ कवितांमधून  ४ विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये, प्रथम क्रमांक : अनिल कांबळे – वाशिम, द्वितीय क्रमांक : अशोक कांबळे – चंद्रपूर, तृतीय क्रमांक: अनुराधा विभुते – सोलापूर तर उत्तेजनार्थ म्हणून साक्षी धवडेकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख  पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विचारमंचावर संस्थाध्यक्ष इंजि. अनिल जाधव, साहित्यिक सुनील हेतकर, कवयित्री कल्पना मलये व मुंबई शाखेचे अध्यक्ष अभय शेवरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धकांचे अभिनंदन करून आ. सो. शेवरेंच्या स्मृतींना जागृत केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन संपन्न झाले.  ज्येष्ठ कवयित्री योगिनी राऊळ, कल्पना मलये, अभय शेवरे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. सुरेखा जाधव, इंजि. संजय जाधव, किशोर हेतकर, अशोक चाफे, तुषार मांडवकर, चंद्रसेन जाधव इ. मान्यवर व कवीगण उपस्थित होते. सदर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक साहित्य संसद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रतिक पवार, सूत्रसंचालन कोषाध्यक्ष स्नेहल तांबे यांनी केले तर आभार सहकार्यवाह प्रथमेश जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!