कुडाळ (अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीची समन्वय बैठक होणार होती, पण मुंबईत माझी अत्यंत महत्वाची बैठक आहे. येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चाही केली. तसेच नारायण राणे यांची सुद्धा भेट घेतली. जो उमेदवार खासदारकीसाठी घोषित होईल, तो नक्की विजयी होईल, असा विश्वास शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मागच्या वेळी ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे आमचा या जागेवर अजूनही दावा आहे. परंतु, आजची बैठक दावे-प्रतिदावे याची नाही. तर ही निवडणूक पंतप्रधान मोदींची आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व जिल्हा संघटक रूपेश परुळेकर हे सुध्दा उपस्थित होते.
यावेळी त्यांनी असेही सांगितले कि, किरण सामंत यांनी काल रात्री ९ वाजता आमच्या पक्षातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व्हीसी झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना त्रास होवू नये म्हणून तो स्टेटस बदलला.या मतदारसंघावर उमेदवारीच जाहीर झालेली नाही. मग यावर आम्ही दावा करणारच. मुंबईत आता महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असून मुख्यमंत्री, फडणवीस हे योग्य तो निर्णयही घेतील.