कुडाळ (अमोल गोसावी) : हा मेळावा पक्षहितासाठी, देशहितासाठी मोदीजींनी देशवासीयांना व कार्यकर्त्यांना अब कि बार ४०० पारची जी हाक दिली आहे ती पूर्ण करून दाखवण्यासाठी आहे. जनतेला पूर्ण समाधान , आनंद देउन कर्तबगार माणसं निर्माण करण हा भाजपचा धर्म आहे. माझे कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्तृत्वावर मला अभिमान आहे. कारण माझे सिंधुदुर्गचे कार्यकर्ते निष्ठावान आणि प्रामाणिक आहेत. पक्षासाठी दिवसरात्र कार्य करतील आणि आपल्या नेत्याला ताकद देतील. तुमच्यावर असलेला अभिमान सार्थकी ठरवा. आपण जे सामाजिक आणि लोकहिताचे काम केलात त्याची परीक्षा लोकसभेच्या निवडणूकीत होणार आहे. भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जा आणि मोदींचे कार्य सांगा असे कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच , कोरोना काळात औषधांमध्ये १५% कमिशन खाल्ले आता बाप बेटा आत जाणार असा आरोप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करून विनायक राऊत म्हणजे शिवसेनेतील बुजगावणे आहे अशी खरमरीत टीकाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग संघटनात्मक आढावा बैठकीत केली. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजप नेते निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार बाळासाहेब माने, प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, कोकण विभाग संघटक शैलेंद्र दळवी, अशोक सावंत, रणजित देसाई, अजित गोगटे, शिल्पा कोरगांवकर , कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, भाजप प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर , यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलले कि , प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक खांद्यावर घेतली पाहिजे , निवडणूकीचा , समाजसेवेचा अनुभव यांचा मेळ घालून काम करणारे मोदिजी देशाला पंतप्रधान म्हणून का आवश्यक आहेत हे येत्या ३४ दिवसात मतदारांपर्यंत पोहोचवण हे प्रत्येक कार्यकर्त्याच काम आह. इथे असणाऱ्या प्रत्येक बूथ प्रमुखाने येत्या लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराला ७० ते ८०% मतदान मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मोदी सरकारच्या माध्यमातून १८०० पेक्षा जास्त योजनांचा फायदा देशातील सामान्य माणसांना होतोय. भाजप सरकारच हे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण ही काळाची गरज आहे. या निवडणूकीत विजयाचा संकल्प घेउनच कामाला लागा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून महायुतीच्या उमेदवाराला २ लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल यासाठी आजपासूनच जोमाने कामाला लागा असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना केले.